बीड : ज्येष्ठ समाजसेवक डॉ. द्वारकादास लोहिया यांचे निधन, आज अंबाजोगाईत अंत्यसंस्कार

Foto

अंबाजोगाई – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते द्वारकादास लोहिया (८१) यांचे शुक्रवारी रात्री १०.४५ वाजता अंबाजोगाई येथील राहत्या घरी निधन झाले. सामाजिक क्षेत्रात ते बाबुजी म्हणून परिचीत होते. मागील काही दिवसांपासुन ते आजारी होते. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी २ वाजता अंबाजोगाईत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

राष्ट्रसेवादल, सानेगुरूजी आरोग्य मंडळ, सोशालिस्ट पार्टी अशा विविध संस्था, संघटनातून त्यांनी समाजातील वंचित घटकांच्या दुःखावर फुंकर घालण्याचे काम केले. सत्व जपणारे आणि संघर्षाची प्रेरणा देणारे व्यक्तीमत्व म्हणून त्यांना महाराष्ट्रात ओळख मिळाली. मानवलोक या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अंबाजोगाईचे नाव त्यांनी जगाच्या नकाशावर पोहोचवले. त्यांच्या निधनाने मानवलोक ही स्वयंसेवी संस्था पोरकी झाल्याची भावना त्यांच्या सहकाऱ्यांची आहे.

डॉ. लोहिया यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी मानवलोकच्या कार्यालय परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात मुले प्रा. अभिजीत लोहिया, मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया,  मुलगी प्रा. अरूंधती पाटील, सुना, नातवंडे, जावाई असा परिवार आहे.

डॉ. लोहिया हे अंबाजोगाई जवळील पाटोदा गावचे. त्यांचा जन्म ७ सप्टेंबर १९३८ रोजी झाला. त्यांचे शिक्षण अंबाजोगाईत तर नांदेडच्या आयुर्वेदिक महाविद्यालयातून ते डॉक्टर झाले. सामान्य माणसांचा आधारवड म्हणून त्यांचा सर्वत्र लौकीक होता. १९७२ च्या दुष्काळापासून त्यांनी सेवेचे व्रत सुरु केले होते मराठवाडा नवनिर्माण लोकायतन अर्थात मानवलोक या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी साडेचार दशकं विविध सामाजिक उपक्रम राबविले. पाणी अडवण्याचे काम त्यांनी विविध राष्ट्रीय अंतरराष्ट्रीय संस्थांच्या माध्यमातून केले. मनस्विनी प्रकल्पाच्या माध्यमातून वंचित व परित्यक्त्या महिलांना आधार दिला. त्यांचे कधी न थांबलोआणि गाव झिजत आहे ही पुस्तके प्रसिद्ध आहेत.

आणीबाणीच्या काळात तुरुंगवास

डॉ. लोहिया यांनी आणीबाणीच्या काळात १९ दिवस तुरुंगवास भोगला होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर जनता दलाकडून त्यांना खासदारकीची उमेदवारी चालून आली होती. मात्र त्यांनी या उमेदवारीला नकार दिला होता. अमर हबीब, अण्णासाहेब खंदारेंसारखी समाजवादी कार्यकर्त्यांची फळी त्यांनी निर्माण केली आहे.